* शिरूर येथील घटना : एकाला अटक; एक जखमी
* तीन पिस्तूल, दुचाकी जप्त
पुणे – सराफ व्यावसायिकाला पिस्तूलाचा धाक दाखवून मारहाण करीत लुटण्याचा प्रयत्न करणार्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दापाश केला आहे. याप्रकरणी म्होरक्याला अटक करून त्याच्याकडून तीन गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूस दुचाकी, असा मिळून सव्वा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक मीतेश घट्टे उपस्थित होते. शरद बन्सी मल्लाव (रा. शिरूर ता. शिरूर), असे अटक केलेल्याचे नाव आहे. शिरूर शहरातील मध्यवर्ती चौकात दि. २८ जानेवारीला रात्री साडेआठच्या सुमारास सराफ व्यावसायिक अशोक कोलथे व त्यांचा कामगार भिका पंडीत (वय ५०) दुकान बंद करीत होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून सराफाच्या दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी कामगार भिका यांनी विरोध केल्याने चोरट्यांनी पिस्तूलचा बट त्यांच्या डोक्यात मारला. त्याच्यावर पिस्टलमधून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध घेतला जात होता. मुख्य सराफ बाजारपेठेत गुन्हा घडल्याने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
तपास पथकाने गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित गुन्हा शरद मल्लाव आणि सागर उर्फ बबलू यांनी केल्याचे उघडकीस आले. दोघेही आरोपी हे सिंहगड किल्ल्याचे जंगलात लपून बसले असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने मुख्य आरोपी शरदला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार सागर उर्फ बबलू जखमी आहे. तो ससूनमध्ये उपचार घेत आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, गणेश जगदाळे, एकनाथ पाटील, प्रदीप चौधरी, अमित सिदपाटील, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, सचिन घाडगे, अतुल डेरे, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, दिपक साबळे, अजित भुजबळ, अक्षय नवले, संदीप वारे, अक्षय सुपे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांनी केली आहे.