सहकारमंत्री वळसे पाटील : ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
रांजणगाव गणपती – रांजणगाव गणपती गावच्या विकासकामांसाठी यापुढे पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे दीपावली पाडव्या निमित्ताने सहकारमंत्री वळसे पाटील यांनी महागणपतीचे दर्शन घेतले. यावेळी नुकत्याच निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सन्मान वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टने जागा उपलब्ध करुन दिल्यास रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या जागेत सुसज्ज असे हॉस्पिटल व महाविद्यालय उभारण्यात येईल, असेही वळसे यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आदर्श सरपंच भिमाजी खेडकर, नानासाहेब पाचुंदकर पाटील, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक आबासाहेब पाचुंदकर पाटील, किरणताई वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, शिरुर- आंबेगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, सरपंच सर्जेराव खेडकर, पूर्वा वळसे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या कविता माणिकराव खेडकर, आजी- माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
रांजणगाव गणपती येथील जनतेने माजी आदर्श सरपंच भिमाजीराव खेडकर, घोडगंगा कारखान्याचे संचालक आबासाहेब पाचुंदकर पाटील व माझ्यावर मतदानातून जो विश्वास व्यक्त केला आहे. तो विकासकामांच्या माध्यमातून सार्थ करुन दाखवू तसेच रांजणगाव गणपती व परिसराच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध राहणार असल्याचे मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी सांगितले.