माजी खासदार आढळराव पाटील ः शिरूर लोकसभा मतदार संघातील विकासकामे होणार
मंचर – शिरूर लोकसभा मतदार संघातील नवनिर्मित मंचर नगरपंचायतीसह आळंदी, चाकण, राजगुरूनगर, जुन्नर आणि शिरूर नगरपरिषदेतील विविध विकास कामांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघातील महत्त्वाच्या कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, आढळराव पाटील यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असतात. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघातील नगरपंचायत व नगर परिषद हद्दीतील 3 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आढळराव पाटील यांना यश आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने मंचर येथे भाजीपाला बाजार तळाजवळ उद्यानाची निर्मिती करणे 1 कोटीे, आळंदी नगरपरिषद शाळा क्र. 4 येथे उद्यान विकसित करणे 60 लाख, चाकण नगरपरिषद हद्दीतील चक्रेश्वर मंदिर स्मशानभूमीलगत संरक्षक भिंत बांधणे व सौर ऊर्जा युनिट उभारणे 35 लाख, राजगुरूनगर स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे 30 लाख, जुन्नर खालचा माळीवाडा ते उत्तरेश्वर मंदिरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे 25 लाख आणि शिरूर नगर परिषदेसाठी विद्युत विभाग व अन्य अनुषंगिक कामांसाठी हायड्रोलिक शिडी असणारे बहुपयोगी वाहन उपलब्ध करणे 25 लाख रुपये असा निधी उपलब्ध झाला आहे.
आढळराव पाटील म्हणाले की, नागरिकांची आग्रही मागणी लक्षात घेऊन गेल्या काही महिन्यांपासून नगरविकास खात्याकडे विविध विकासकामांची मागणी केली होती. त्यास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 3 कोटी निधी मंजूर केला आहे. यापुढील काळातदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित विकासकामांना प्राधान्याने निधी मिळावा यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा सुरू राहणार आहे.