वारूळवाडीतील पुलाची दूरवस्था : आमदार करणार पाहणी
नारायणगाव – वारुळवाडी (ता. जुन्नर) येथील पुणे नाशिक महामार्गापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत व नारायणगाव बस स्थानक ते नारायणवाडी रस्त्याच्या रुंदीकरणासह कॉंक्रिटीकरण करण्यासाठी आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून 2 कोटी 85 लाख रुपये मंजूर झालेले आहे. वारुळवाडीतील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून महामार्गापासून वारुळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कळकीच्या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वारुळवाडीतील कळकीच्या ओढ्यावरील बांधकाम करण्यात आलेल्या पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलावर काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा खड्डा पडल्याने अपघाताचा धोका वाढला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील खड्ड्यात भराव टाकून तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी केली होती.
गुरुवारी (दि. 19)ओढ्यावरील पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे जीर्ण झाले असून पुलाचे नवीन काम होणे गरजेचे आहे; परंतु प्रशासनाकडून तसे न करता पुलाची तात्पुरती डागडुजी करून जीर्ण झालेल्या कठड्याचा काही भाग तोडून त्यातच भराव टाकून जोडण्याचे काम सुरू आहे.
अशा पद्धतीने पुलाचे काम केले गेले तर येणाऱ्या दिवसात पूल पुन्हा ढासळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुलाची संपूर्ण दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वारुळवाडीतील नागरिकांनी केली आहे. पुलाच्या संपूर्ण दुरुस्तीच्या मागणीसाठी तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता केशव जाधव व सहायक अभियंता ज्ञानेश्वर रायकर यांनी पुलाची पाहणी केली आहे.