सोरतापवाडी – शेतकरी गटातील सदस्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीवर भर देऊन आजच्या युगातील आधुनिक शेती करुन निरनिराळ्या प्रकारचे रोग कसे कमी होतील. तसेच शेतकरी गट फार्म प्रोड्यूसर कंपनीला कशाप्रकारे जोडता येतील व कृषी योजनांचा लाभ कशाप्रकारे घेता येईल याचे मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी हडपसर गुलाबराव कडलग यांनी केले.
कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथे डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या अंतर्गत सेंद्रिय शेती शेतकरी गट प्रशिक्षण घेण्यात आले, याप्रसंगी कडलग बोलत होते. यावेळी कृषी पर्यवेक्षक हडपसर 1 आर. एस. डावखर, सरपंच मंगेश कानकाटे, उपसरपंच मंगल पवार, अश्विनी कड, राधिका काकडे, आदी ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते. कृषी सहाय्यक ए. पी. साळुंखे यांनी प्रास्ताविक केले तर सुधीर शितोळे यांनी आभार मानले.
गणेश मोरे यांचा सत्कार
यावेळी गावातील गणेश मोरे हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आली होती.
या परीक्षेत गणेश मोरे याने सहभाग घेतला होता. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत गणेशने उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवल्यामुळे कोरेगावमुळ ग्रामपंचायत वतीने सरपंच मंगेश कानकाटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.