व्यावसायिकांनी थेट रस्त्यावरच मांडले बस्तान : नगपरिषदेकडून डोळेझाक
जुन्नर – शहरात अतिक्रमणांना पेव फुटले आहे. व्यावसायिकांनी थेट रस्त्यावरच बस्तान मांडल्याने वाहतूक कोंडी होत असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. दरम्यान, रस्त्यावर बसणार्या व्यावसायिकांकडून दैनंदिन भुईभाडे वसूल करणार्या नगरपरिषदेला मात्र नागरिकांना होणारा त्रास का दिसून येत नाही याबाबत शहरातील नागरिक व व्यापारी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
धान्य बाजार शंकरपुरा या ठिकाणी जुन्नर नगरपरिषदेची तीन मोठी व्यापारी संकुले तर दुसर्या बाजूला खासगी व्यापारी संकुले आहेत. या भागात अनेक लहान मोठी दुकाने कार्यरत आहेत. तसेच या रस्त्यालगतच तहसील, पोलीस, न्यायालय, वन विभाग, सिटीसर्वे, दुय्यम निबंधक आदी शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आहे. या भागात दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते.
जुन्नर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने दिवसभर बाहेरगाव वरून आलेल्या नागरिकांची व ते घेऊन आलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी गर्दी असते. नागरिक आपली वाहने या रस्त्यावरच मनमानी पद्धतीने पार्किंग करून शासकीय कार्यालयात गेलेली असतात. या आडव्या तिडव्या उभ्या केलेल्या वाहनांमुळे या भागात नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत असते.
याशिवाय या रस्त्यावर कुठेही कशाही पद्धतीने तसेच दुभाजकालगत भाजीपाला, फळ विक्रेते मनमानी पद्धतीने बसलेले असतात. आपल्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे याबाबत काही देणे घेणे या व्यवसायाकांना नसून बिनधास्तपणे आपली हक्काची जागा आहे. असे समजूनच ते व्यापार करीत असतात.
नगर परिषदेकडून रस्त्यावर बसणार्या किरकोळ व्यावसायिकांकडून दैनंदिन भुईभाडे वसूल केले जाते. मात्र रस्त्यावर कुठे बसावे ,कशा पध्दतीने बसावे . वाहतुकीला अडथळा होणार नाही याबाबत या व्यावसायिकांना कोणत्याही सूचना दिल्या जात नाही. जुन्नर नगरपरिषद, पोलीस व महसूल प्रशासनाने शहरातील मुख्य बाजर पेठेतील दररोज निर्माण होणार्या या प्रश्नावर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी नागरीक व व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे.
अनेकदा वादाचे प्रसंग
धान्य बाजार, शंकरपुरा पेठ रस्त्यालगत शासकीय धान्य गोदामे असून तेथे पुण्याहून शासकीय धान्य घेऊन मोठ्या गाड्या येत असतात. त्यांना तेथून जा-ये करण्यासाठीही रस्ता या ठिकाणाहून मिळत नाही. धान्य बाजार या ठिकाणी दोन्ही बाजूस गेल्या अनेक वर्षांपासून आपले व्यवसाय करणारे स्थानिक व्यापारी असून त्यांच्या दुकानाबाहेर रस्त्यावर हे व्यवसायिक बसून राहत असल्याने अनेकदा त्यांच्यात वादाचे प्रसंग घडतात.