शासकीय अधिकारी, कर्मचार्यांना सहकारमंत्री वळसे पाटील यांचे आवाहन
मंचर – केंद्र व राज्य शासनाच्या वतीने गरीब आणि गरजूंसाठी विविध लाभाच्या योजना असून त्याचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचार्यांनी जनजागृती करावी, असे आवाहन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुका पंचायत समिती (घोडेगाव) येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकार्यांना मार्गदर्शन करताना सहकारमंत्री वळसे पाटील बोलत होते. यावेळी आदिवासी समाजाचे नेते सुभाष मोरेमारे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप,
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष निलेश स्वामी थोरात, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन पाटील, तहसीलदार संजय नागटिळक, प्रभारी गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे, महावितरणचे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर यांच्यासह विविध यंत्रणेचे अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
सहकार मंत्री वळसे पाटील यांनी पंचायत समिती, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, उपनिबंधक कार्यालय, महावितरण आदी विभागाकडून प्रलंबित कामांची आणि योजनांची माहिती जाणून घेतली. ते म्हणाले की, पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने पशुधनासाठी औषधोपचार अधिक वाढवावेत.
तालुक्यात नवीन पशु वैद्यकीय दवाखाना सूरू करावयाचा असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. नवीन अंगणवाडी बांधकामासाठी आवश्यक ठिकाणचा प्रस्ताव तयार करावा. महिलांसाठी स्वच्छतागृह नसलेल्या ठिकाणी तशी व्यवस्था करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
ठाकर आणि कातकरी समाजातील नागरिकांना योजनांच्या लाभासाठी कागदपत्रांची पुतर्ता करण्यासाठी सर्व विभागांनी आग्रही राहून त्यांना विविध योजनांचे लाभ द्यावेत. धरण पुनर्वसन गावातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी सर्व विभागानी प्रयत्न करावेत. तालुक्यातील प्रलंबित कामे, विविध प्रकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानी कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
नवसंजीवनी योजनेअंतर्गत…
कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून बालकांना सशक्त करण्यासाठी नवसंजीवनी योजनेअंतर्गत उपाययोजना कराव्यात. लघु पाटबंधारे विभागाने नवीन बंधारे तयार करण्यासाठी नियोजन करावे. वैयक्तिक लाभाच्या योजनेवर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ द्यावा. तालुका कृषी अधिकारी यांनी स्ट्रॅाबेरी लागवडीसाठी न्युक्लीअस बजेटच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी लागवडी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना सहकारमंत्री वळसे पाटील यांनी दिल्या.