इंदापूर : शहाजी नगर येथील प्रसिद्ध असलेले दत्त देवस्थान येथे दत्त जन्मोत्सव सोहळा, काल्याच्या कीर्तनाच्या सांगतेने व दत्त जन्माचे पाळणे गात, अन्नदान करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या भजनाच्या निनादात साजरा करण्यात आला. राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे तसेच शाहू शिक्षण संस्थेच्या प्रमुख विश्वस्त कोमलताई साळुंखे- ढोबळे यांच्या हस्ते मानाची आरती करण्यात आली.
देवस्थानच्या वतीने गेल्या सात दिवसांपासून गुरुचरित्र अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये भजन, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ गुरुचरित्र वाचन अखंड करण्यात आले. येथील गुरुचरित्र पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहातील, दत्तजन्माची(ता. 26डिसेंबर)मंगळवार रोजी श्रींची पहाटेची महापूजा इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप, तसेच नीरा भीमा साखर कारखान्याचे सुभाष दिवटे या कुटुंबीयांच्या हस्ते पार पडली. देवस्थानच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते, देवस्थानचे प्रमुख तानाजीराव गायकवाड यांनी स्वागत केले.
पहाटेच्या प्रहरात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामजप करत अभिषेक पार पडला. दुपारी श्री दत्त भजनी मंडळ व संत गुलाब भजनी मंडळ यांचा भजन जुगलबंदीचा कार्यक्रम पार पडला. तद्नंतर काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करण्यात आली.
हभप बापू महाराज कन्हेरकर यांनी उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात या अभंगावर विवेचन केले. तर प्रथेप्रमाणे श्री गुरुदत्त रायाचा पालखी सोहळा मंदिराला प्रदक्षिणा करून मंदिरात विसावला. पालखीचा मुख्य पादुका ठेवण्याचा मान नीलकंठ मोहिते व राणी नीलकंठ मोहिते यांना देवस्थानच्या वतीने देण्यांत आला.