पिरंगुट – आदर्शगाव अंबडवेट येथे दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दत्तजयंतीनिमित्त येथील प्रसिद्ध दत्तमंदिरात दरवर्षीप्रमाणे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराला आकर्षक अशी नयनरम्य विद्युत रोषणाई केली होती. भाविकांनी प्रचंड गर्दी करत शिस्तीमध्ये दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला.
दत्तजयंतीनिमित्त आयोजित सप्ताहामध्ये विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये दररोज सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, दररोज सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत प्रवचन, सायंकाळी 7 ते 9 कीर्तन, तसेच रात्री जागर असा नित्य कार्यक्रम होता.
दत्तजयंतीदिवशी दत्त जन्मोत्सवाआधी सामुदायिक भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर दत्तजन्म साजरा करण्यात आला. रात्री उशिरा कीर्तन व भाविकांना दररोज अन्नप्रसादाचे आयोजन केले गेले. यानिमित्ताने अंकुश महाराज रेणुसे, नवनाथ महाराज घावरे, दत्तात्रय महाराज तेरदाळे, संजय महाराज भरम, मंदार स्वामी येणपुरे, दशरथ महाराज वहाळे यांनी प्रवचन सेवा दिली तर अभय महाराज टिळक, शरद महाराज घोळवे, बाळकृष्ण महाराज डांगे, राजेंद्र महाराज दहीभाते, विजय महाराज जगताप, राम महाराज शास्त्री, श्रीकांत महाराज पातकर व ज्ञानेश्वर महाराज ढमाले यांची कीर्तन सेवा झाली.
समस्त ग्रामस्थ अंबडवेट यांनी या दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. अंबडवेट भजनी मंडळींनी भजन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मुळशीतील सर्व गायक व वादक यानिमित्ताने उपस्थित होते. स्टार इलेक्ट्रिकच्या धनंजय शिंदे आणि अजिंक्य शिंदे बंधूंनी नेहमीप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.