पवन मावळ – नवीन वर्षाच्या स्वागताला बहुतांश पर्यटक पवनानगर परिसराला पसंती देतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून येथील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आला आहे. ३० डिसेंबरपासून हे बदल असणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.
पवनानगर धरण परिसरात दि.३१ डिसेंबर आणि नववर्षाभिनंदनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. त्यामुळे बाहेर गावावरुन येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे पवनानगर परिसरात वाहतुक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० डिसेंबर मध्यरात्री एक वाजल्यापासून ते १ जानेवारी पर्यंत पवनानगर (ता. मावळ) येथील रस्त्यावरील वाहतुक वळविण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हे वाहतूकीमधील बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येणारे पर्यटक व ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे.
– किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे
असे असणार आहेत वाहतूकीमधील बदल
पुणे-मुंबई-कामशेत बाजुकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी हलकी चार-चाकी वाहने बंद करुन ती येळसे ग्रामपंचयात फाटा येथून डावीकडे शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे) कोथुर्णे-मळवंडी फाटयापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे वारु फाटा, ब्राम्हणोली फाटा मार्ग अशी एकेरी वाहतुक करुन जवन-फांगणे, ठाकुरसाई, खडक गेव्हंडे, जवण-चावसर-मोरवे-तुंग अशी जातील.
पुणे-मुंबई-कामशेत बाजुकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी जड-अवजड वाहने पवनानगर मार्गे, जुने रेस्ट हाऊस, केदारी खानावळ चौकातून सात नंबर कॉलनी, पत्राचाळ, ग्रामपंचायत सचिवालय अशी बाहयवळण मार्गे जातील.
दुधीवरे बाजूकडून पवनानगरकडे येणारी जड-अवजड वाहने ही दुधीवरे, शिंदगाव, आंबेगांव, कालेगांव, पवनानगर बाजार, अशी जातील.
तुंग, मोरवे, चावसर, जवन, खडक, गेव्हडे, ठाकुरसाई, फांगणे बाजूकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी हलकी चारचाकी वाहनांची वाहतुक बंद करुन ती एकेरी वाहतुक वाहतुक करुन ब्राम्हणोली फाटा उजवीकडे, वारु फाटा सरळ, मळवंडी, कोथुर्णे फाटयावरुन डावीकडे कोथुर्णे गावातून उजवीकडे, शिवली (विजय आडकर यांचे घरापासून डावीकडे येळसे बाजुकडे) येळसे ग्रामपंचायत फाटा, उजवीकडे कामशेत, मुंबई- पुणे अशी जातील.