विनोद गोलांडे
सोमेश्वरनगर- पुणे जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करतात. अनेक शेतकरी, सुशिक्षित तरुणांनी कर्ज काढून आधुनिक पद्धतीने व्यवसाय सुरू केला. अनेक शेतकऱ्यांना दूग्ध व्यवसायाने उभारी दिली आहे. अलीकडच्या काही वर्षांपासून दूध व्यवसायामागील शुक्लकाष्ठ संपता संपत नसल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. बारामती तालुक्यात “आमदन्नी अठ्ठणी, खर्चा रुपया’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. एकीकडे दरातील गळचेपी आणि दुसरीकडे पशूखाद्य आणि चाऱ्याचा वाढलेला दर यातील तफावत शेतकऱ्यांना घाट्यात नेत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून करोनामुळे प्रत्येक घटकांतील नागरिक, तरूण, महिलांच्या हातचे काम गेले आहे. त्यामुळे कामानिमित्त शहरवासी झालेली तरुण पिढी पुन्हा गावी परतली आहे. ते पर्यायी मार्ग शोधत आहेत. लॉकडाऊनंतर दुग्ध व्यवसाय डबघाईला आला आहे. विवाह समारंभ, सामाजिक कार्यक्रम, उत्सव, हॉटेल्स, मॉल्स, स्वीटमार्ट बंद असल्याने दुधाला मागणी घटली आहे. याचे कारण पुढे करून सहकारी तसेच खासगी दूध संघांनी दरात मोठी कपात करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला आहे.
दूध संघांनी दुधाचे दर कमी केले असतानाच बाजारात मात्र, पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कडब्याचे दरही वाढले आहेत. सरकी पेंडीचे दर प्रतिक्विंटल 2 हजार 800 हजार रुपयांवरून 3 हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. कडब्याचे दर अडीच हजार रुपये शेकड्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे एकीकडे पडलेले दर आणि दुसरीकडे पशुखाद्याच्या दरवाढीमुळे दूध व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहेत. त्यामुळे काही शेतकरी आता हा व्यवसाय बंद करीत आहेत.
फॅटनुसार दरवाढीत घाटाच “घाटा’
पुणे जिल्ह्यात पूर्वी गायीच्या दुधाचा 25 ते 26 रुपयांपर्यंत असणारा दर आता 18 ते 20 रुपयांवर खाली आला आहे. म्हशीच्या दुधासाठी 35 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनपूर्वी दूध संघातर्फे म्हशीच्या दुधाला फॅटनुसार कमाल 45 रुपये प्रतिलीटरपर्यंत दर मिळत होता. गायीच्या दुधालाही 35 रुपयांपर्यंतचा दर मिळत होता.
आता म्हशीच्या दुधाला कमाल 35 रुपये प्रतिलीटरचा दर मिळत आहे. गायीच्या दुधाला 25 रुपये प्रतिलीटरचा दर मिळत आहे. पुणे जिल्हा दूध संघाकडून गायीच्या दुधाला 3.5 साठी 25 ते 26 रुपये तर म्हशीच्या 6.0 साठी 45 ते50 रुपये दर दिला जातो. जिल्ह्यात दूध उत्पादकांची संपूर्ण भिस्त खासगी डेअरींवरच आहे.
दरदिवशी शेकडो लिटर दूध घालतो. पण, दर 25 ते 27 रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त मिळत नाहीत. पशुखाद्याचे दर आणि दुधाला मिळणारे दर याचा ताळमेळ बसेना. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आहे.
– सचिन भापकर, दूध उत्पादक, चौधरवाडी.