हत्तीला ठार करण्यास उत्तर प्रदेशात बंदी
लखनौ, दि. 31 – हत्ती हा प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने राज्यात हत्तीला पकडणे व ठार मारणे यावर निर्बंध घातले आहेत. राज्यात सध्या 520 हत्ती आहेत.
सरकारी नोकरांना बोनस मिळावा
पुणे – सरकारी व खासगी सर्व कामगारांना बोनस मिळाला पाहिजे. चहा, साबण, तेल, डाळी इत्यादी जीवनावश्यक वस्तूचे स्वस्त दराने रेशनवर वाटप करा, किमान वेतन कायद्याची योग्य अंमलबजावणी करा, किमान व्यवसाय कर रद्द करा, कामगार मालक संघर्षामध्ये पोलिसांना पक्षपाती हस्तक्षेप बंद करा अशा मागण्या कामगार हक्काच्या वतीने कामगार मेळाव्यात करण्यात आल्या.
रोजगार हमी योजनेखालील जिझीया कर रद्द करावा
पुणे – केंद्र-राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त कृती समितीची बैठक दि. ना. भिष्णूरकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन तीत पुढील ठराव मुजूर झाले.
1) केंद्र सरकारने राष्ट्रीय वेतन धोरणाबाबत त्वरित पावले उचलून, वेतन विविधतेत सुसूत्रता आणावी.
2) जोपर्यंत गरजेवर आधारित किमान वेतन देणे शक्य नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना बोनस हा विलंबित वेतन म्हणून मंजूर करावा.
3) गोपनीय अहवाल लिहिण्याची व त्यावर लक्षावधी रुपये खर्च करण्याची पद्धत बंद करावी.
4) सरकारी कर्मचारी हा “सेवक’ असल्याने त्याला “धंदेवाईक’ समजून सरकार जो रोजगार हमी योजनेखाली जिझीया कर वसूल करते तो रद्द करावा.