पळसदेव -पळसदेव माळवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी व कामगारांना रस्त्यावरून जात असताना तीन दिवसांत तीन ठिकाणी मगरीचे दर्शन घडले. त्यामुळे संपूर्ण माळेवाडी परिसरात भीतीच्या छायेत गेला आहे. मात्र, नजीकच उजनी धरण व तलाव असतानाही मगर इतरत्र शेतातून भटकत असल्याने ती प्रजननासाठी जागा शोधत असल्याची शक्यता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
उजनी जलाशयात अनेक मगरी आहेत. तरी याआधी लोकांना विश्वास बसत नव्हता. मात्र, भीमानगर आणि कंदर या दोन ठिकाणी मगरी पकडल्यानंतर उजनी धरणामध्ये मगरी असल्याचे निदर्शनास आले. गेल्यावर्षी पळसदेव येथील गुळगुळीच्या ओढ्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी मगर दिसली होती.
त्यानंतर तीच मगर पळसदेव तलावात गेल्याचे सांगण्यात आले. तब्बल एक वर्षानंतर हीच मगर कोठे गेली, का मृत झाली, यावर अनेक दिवसापासून तर्क-वितर्क लढवले जात होते. परंतु (दि.17) पळसदेव- माळेवाडी येथील कॅनालजवळ निलेश भोसले यांनी पहिल्यांदा मगरीचे दर्शन झाले. त्यांनी अनेकांना सांगितले. परंतु लोकांनी विश्वास ठेवला नाही.
(दि. 18) अक्षय जावळे हा तरुण शेलारपट्टा येथून लोणी देवकर येथील कंपनीत कामाला जाण्यासाठी रात्री साडेनऊच्या दरम्यान निघाला होता. डॉ. शहा यांच्या फार्महाऊसजवळ दुचाकीवरून आल्यावर त्याला रस्त्यावर मगर दिसली, त्याने तात्काळ दुचाकीला अर्जेंट ब्रेक लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी वेगात असल्याने तशीच घसरत मगरीच्या जवळ गेली. त्यानंतर त्याने काही फुटावरून 10 फूट लांबीच्या मगरीचे दर्शन घेतले. त्याने तात्काळ अनेकांना फोन करून माहिती दिली.
मात्र, सर्वांनीच त्याच्यावर अविश्वास दाखवला. मात्र, त्याने काढलेले मगरीचे मोजकेच काही फोटो व्हॉट्सअपवर शेअर केल्याने सर्वांना खरे वाटले. प्रत्येकजण मगरीला पाहण्यासाठी निघाले. परंतु तोपर्यंत मगर तेथून गायब झाली होती.
दुसऱ्या दिवशी (दि.19) बाळू महादेव फुले यांनी सकाळी अकराच्या दरम्यान शेतात जाताना अवघडे यांच्या विहिरीच्या कडेला मगर उन्हात पडल्याची दिसली. त्यांनी ही माहिती तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर सायंकाळपर्यंत वनविभागाचे एकही अधिकारी फिरकले नसल्याचे नागरिकांनी सांगितले.