दौंड – प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे समस्त मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे नुपुर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी दौंड शहर व तालुका मुस्लीम समाजाच्या वतीने दौंड पोलिसांना करण्यात आली होती. त्यानुसार माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी नुपुर शर्माच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नुपुर शर्मा यांच्या समाजविघातक कृत्याचा निषेध करण्यासाठी मुस्लीम समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि. 10) दौंड येथे निषेध मोर्चा व नुपुर शर्मा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करणार असल्याचे निवेदन यावेळी दौंड पोलिसांना देण्यात आले होते. यावेळी बादशहा शेख, सोहेल खान, मतीन शेख, शहानवाज पठाण, इस्माईल शेख, शफी मुलाणी, हमीद शेख, इमरान शेख, प्रकाश भालेराव,सतीश भालेराव, सतीश थोरात, विकास कदम, इंद्रजीत जगदाळे, गुरुमुख नारंग, आनंद पळसे, नागसेन धेंडे, अश्विन वाघमारे, आबा वाघमारे, अनिल साळवे, राजेश जाधव, निखिल स्वामी, अजय राऊत, संजय बारवकर उपस्थित होते.
नुपूर शर्मा, नवीनकुमार जिंदालवर कारवाई करा
मंचरमध्ये मोर्चा काढून निषेध
मंचर – मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व माध्यम प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मुस्लीम बांधवांनी मंचर (ता. आंबेगाव) येथे मोर्चा काढून निषेध केला.
प्रेषित मुहम्मद पैगंबर आणि इस्लाम धर्मग्रंथ कुराण याविषयी गलिच्छ, आपत्तीजनक आणि बदनामीकारक वक्तव्य करून भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जुम्मा हुसेनी ट्रस्ट मंचर यांच्या वतीने करण्यात आली. बाजारपेठमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुस्लीम बांधवांनी मोर्चा काढून निषेध केला.
यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष राजू इनामदार यांनी नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. यावेळी मौलाना मुक्ती फरीद इनामदार, मौलाना वसीम रिझवी, मौलाना नुरी, अल्लूभाई इनामदार, शकील जाफरी यांच्यासह शिया आणि सुन्नी समाजातील मुस्लीम बांधव उपस्थित होते. यावेळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर याच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.