पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून ओसरला असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयातील कामकाज पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल एम.डब्ल्यू चंदवाणी यांनी राज्यातील प्रमुख जिल्हा न्यायाधिशांना दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा न्यायालय सोमवारपासून (दि. 14) पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी याबाबत आदेश काढला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजाला आता गती मिळणार आहे.
करोनाच्या तिसऱ्या लाटीमुळे न्यायालयीन कामकाजावर निर्बंध लादण्यात आले होते. सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 2 ते 4 या दोन सत्रांमध्ये न्यायालयाचे कामकाज सुरू होते. रिमांड, जामीन आणि केवळ महत्त्वाच्या प्रकरणात सुनावणी होत असत. त्यामुळे न्यायीक अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीसह कामकाज सुरू होणार आहे. मात्र, न्यायालयातील कामकाज पूर्ववत करण्यासोबतच करोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी न्यायालय परिसरात येणाऱ्या नागरिकांनी मास्क परिधान करणे तसेच सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टसिंग आदी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आदेशात म्हटले आहे.