कोरेगाव बुद्रुक येथील 150 कार्यकर्त्यांच्या हाती “घड्याळ’
आंबेठाण – भाजपचे वर्चस्व असलेल्या पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटात भाजपला म्हणजेच माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील जबर हादरा बसला आहे. गटातील 150 कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करीत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलाची शक्यता आहे.
कोरेगाव बुद्रुक (ता. खेड) येथील उद्योजक पोपट कल्हाटकर, विद्यमान सरपंच काजल प्रवीण लगाडे यांचे पती प्रविण लगाडे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश कल्हाटकर, निवेदक अमोल डावरे सह 125 ते 150 युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील, खेड राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास सांडभोर, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे यांच्या उपस्थितीत व खेड राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष जयसिंग दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते पाटील, माजी सभापती रमेश राळे, माणिक कदम, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे, युवक राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष कैलास लिंभोरे, पश्चिम विभाग अध्यक्ष अमोल पानमंद, पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष अमोल पिंगळे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवकच्या तालुका उपाध्यक्षपदी पोपट कल्हाटकर यांची तर सर्जेराव गाडे यांची तालुका प्रवक्तेपदी फेरनिवड केली. जयसिंग दरेकर यांनी खेडसह पिंपरी-पाईट गटात राष्ट्रवादीचे मजबुत संघटन करण्यास सुरुवात केली आहे.
पुढील काळामध्ये तालुक्यामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सद्यस्थितीत राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता नसताना सुद्धा आम्ही करत असलेल्या सर्वसामान्य जनतेची वैयक्तिक कामे व विकासकामांमुळे सुज्ञ जनता आमच्यावर विश्वास ठेवून आमच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहे. पुढील काळामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अनेक गावातील ग्रामस्थांचे प्रवेश घेणार आहोत.
– जयसिंग दरेकर, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, खेड तालुका
आजचा प्रवेश हा पाईट पिंपरी गटातील पुढच्या विजयाची नांदी आहे. विधानसभेप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एक नंबरचाच पक्ष राहील.
– अमोल पानमंद, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, खेड तालुका पश्चिम विभाग