शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत काळभोर
लोणी काळभोर – सध्या केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाने अनेक योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते; परंतु सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वच समाज घटकांना वेगवेगळ्या माध्यमातून डावलले आहे. आगामी सर्वच निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) हवेली तालुका अध्यक्ष प्रशांत काळभोर यांनी व्यक्त केले.
माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी “होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमा अंतर्गत राज्यभरात आपल्या पक्षाच्या वतीने आंदोलन करुन सरकारचा पोलखोल करण्याचे काम सुरू केले आहे. या संदर्भात आज लोणी काळभोर (ता. हवेली) येथे एक आंदोलन झाले. यावेळी प्रशांत काळभोर बोलत होते. पुणे विभागाचे समन्वयक आमदार रवींद्र मिर्लेकर, उपनेते सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार तसेच माजी आमदार महादेव बाबर,
माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, कामगार सेना चिटणीस रघुनाथ कुचिक, शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर (माऊली) कटके, शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख मनोज इसवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हवेली तालुक्यामध्ये करूया बोल घेवड्या योजनांचा भांडाफोड, होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी चित्रफितीद्वारे सरकारने दिलेल्या आश्वासनांचा आढावा तसेच किती योजना पूर्ण झाल्या व किती योजना पूर्ण झाल्या नाहीत अशा प्रश्नावलीची नागरिकांना माहिती विचारत रथ गावोगाव फिरविण्यात आला.
यावेळी शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, जिल्हा संघटक रमेश भोसले, युवा सेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव, युवा सेना तालुकाप्रमुख प्रताप कांचन, उपतालुका प्रमुख राजेश काळभोर, स्वप्नील कुंजीर, तालुका संघटक तानाजी कुंजीर, विभाग प्रमुख श्रीकांत मेमाणे, संजय कुंजीर, कृष्णा चौधरी, राहुल काकडे, बाळासाहेब काळभोर, ज्ञानेश्वर काळभोर, राहुल काळभोर, संतोष भोसले, नितीन जगताप, शिवाजी काळभोर, राजेंद्र जोशी, अजय माने, विनोद वाघ, अतुल शिंदे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.