शिरूर – काठापूर खुर्द (ता. शिरूर) येथील हनुमान मंदिर मठ परिसरात शिरूर पोलिसांनी शुक्रवारी (दि. 19) रात्री टाकलेल्या छाप्यात मठाच्या महाराजांकडे 10 किलो गांजा, 14 गांजाची झाडे असा एकूण 41 किलो 445 ग्रॅम गांजा व एक सांबर हरणाचे कातडे व तीन शिंगे असा एकूण 2 लाख 57 हजार 222 रूपयांचा मुद्देमाल शिरूर पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी मठाचे तथाकथित महाराज यांना अटक करण्यात आली आहे.
शांताराम बाबुराव ढोबळे उर्फ बापू महाराज (वय 53, रा. हनुमान मंदिर मठ, काठापूर खुर्द ता. शिरूर, मूळ रा. पारगाव ता. आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्या महाराजांचे नाव आहे. त्यांना शिरूर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना गुप्त बातमीदारामार्फत शांताराम बाबुराव ढोबळे उर्फ बापु महाराज हे त्यांच्या हनुमान मंदिर मठामध्ये व मठाच्या परिसरात त्यांच्या ओळखीच्या लोकांना गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिरूर पोलिसांच्या पथकाने काठापूर खुर्द येथील हनुमान मंदिर मठामध्ये शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास सापळा रचून छापा टाकला.
त्यावेळी त्याठिकाणी मठ चालविणारे तथाकथित महाराज शांताराम बाबूराव ढोबळे उर्फ बापू महाराज यांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्या ठिकाणाहुन 10 किलो तयार गांजा तसेच मठाच्या वऱ्हांड्यात व मठाच्या अवतीभोवती लावलेली गांजाची 14 झाडे असा 41 किलो 445 ग्रॅम वजनाचा गांजा व गोणीमध्ये भरून ठेवलेली सांबर प्राण्याची तीन शिंगे व 1 कातडी असा एकूण 2 लाख 57 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासू शनिवारी पहाटेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करीत आहे.