सिद्धू यांनी पाक पंतप्रधानांना ‘मोठा भाऊ’ संबोधल्याने मोठा वाद; गंभीर म्हणाला, आपल्या मुलांना…

नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू व काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या एका वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिद्धू शनिवारी पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब येथील दरबार साहिब येथे गेले होते. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यातर्फे सिद्धू यांचे एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने स्वागत केले. स्वागतासाठी आलेल्या अधिकाऱ्याला आलिंगन देत सिद्धू, ‘इम्रान खान आपल्याला मोठ्या भावाप्रमाणे असून त्यांच्याकडून खूप प्रेम मिळालं असल्याचं’ सांगत आहेत असं याबाबत जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये ऐकू येतंय.

दरम्यान, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सिद्धू यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी, “राहुल गांधी यांची सर्वाधिक लाडके नेते असलेले सिद्धू पाकिस्तानी पंतप्रधानांना ‘मोठा भाऊ’ म्हणतात. गेल्यावेळी यांनीच जनरल बाजवा यांची गळे भेट घेऊन स्तुतीसुमने उधळली होती. गांधी बंधू-भगिनीने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याऐवजी पाकिस्तान प्रेमी सिद्धूला निवडले यात काहीच आश्चर्य नाही.” असा संदेश लिहला आहे.

सिद्धू यांचे उत्तर 

दरम्यान, इम्रान यांना मोठा भाऊ संबोधल्यानंतर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली असतानाच सिद्धू यांनी मात्र याबाबत हसतमुखाने प्रतिक्रिया दिली. “भाजपला जे काही म्हणायचंय ते म्हणू द्या” असं ते म्हणाले.

गंभीरचा हल्लाबोल 

सिद्धू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने चांगलेच सुनावले. याबाबत प्रतिक्रिया देताना आपल्या सोशल मीडियावरील खात्यावर सिद्धूला उद्देशून, “दहशतवादी देशाच्या प्रमुखाला मोठा भाऊ म्हणण्याआधी आपल्या मुलाला अथवा मुलीला सीमेवर लढायला पाठवा.” अशी निनावी टीका केली.  

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.