पिंपरी – मागील सलग चार वर्षे स्वच्छ सर्वेक्षणात पिछाडीवर जात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची यावर्षी सर्वेक्षणात सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 मध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा देशात 19 वा, तर राज्यात पिंपरी-चिंचवड शहर टॉप 10 मध्ये आले असून पाचवा क्रमांक आला आहे. स्वच्छता मानांकनात सुधारणा झाल्याने प्रशासन, सत्ताधाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
स्वच्छ भारत सर्वेक्षणाचा शनिवारी (दि.20) निकाल जाहीर झाला आहे. मागील वर्षी पिंपरी-चिंचवडचा देशात 24, तर राज्यात सातवा क्रमांक आला होता. केंद्र सरकारने दोन वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात बदल केले होते. स्वच्छ सर्वेक्षण वर्षातून एकाचवेळी करण्याचे बंद केले. त्याऐवजी तीन टप्प्यात सर्वेक्षण केले जाते. पहिल्या टप्प्यापासूनच सर्वेक्षणात शहराची यावर्षी देखील चांगली सुधारणा होती. आता या स्वच्छ सर्वेक्षणाचा अंतिम निकाल लागला आहे. त्यामध्ये शहरात मोठी सुधारणा झाली असून यावर्षी 19 वा, तर राज्यात पाचवा क्रमांक आला आहे.
दरम्यान, 2016 मध्ये स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहर देशात टॉप 10 मध्ये होते. शहराचा 9 वा क्रमांक आला होता. तर, महाराष्ट्रातून एक नंबर आला होता. परंतु, त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली. देशात नवव्या क्रमांकावर असलेले पिंपरी-चिंचवड शहर 2017 मध्ये थेट 72 व्या नंबरवर फेकले गेले होते. 2018 मध्ये देशात 43 वा, तर, राज्यात सहावा क्रमांक होता. 2019 मध्ये पुन्हा घसरण होऊन देशात 52 वा, तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता. मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये या मानाकंनात काही प्रमाणात सुधारणा झाली होती. गेल्या वर्षी शहराचा देशात 24 वा तर राज्यात सातवा क्रमांक आला होता. त्यामध्ये यावर्षी आणखी सुधारण होऊन देशामध्ये शहराने 19 वा क्रमांक मिळवला आहे. तर राज्यामध्ये टॉप टेनमध्ये पुन्हा स्थान मिळवत पाचवा क्रमांक मिळवला आहे.
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्षभर चांगले काम केले आहे. त्यामुळे शहराच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. गेल्यावर्षी देशात 24 व्या क्रमांकावर पिंपरी चिंचवड शहर होते. आता आपण 19 व्या क्रमांकावर आहोत. तर राज्यामध्ये आपण पहिल्या पाच शहरामध्ये येत पाचवा क्रमांक मिळवला आहे.
– संदीप खोत, सहायक आयुक्त, आरोग्य विभाग.