राजगुरूनगर – पती-पत्नीच्या भांडणातून रविवारी (दि. 4) आईने मुलीचा गळा अवळून खून केल्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. तिन्हेवाडी येथे एका परप्रांतीय महिलेचा खून झाला असून गोसासी येथे पती-पत्नीच्या भांडणातून पतीने आत्महत्या केल्याने एका दिवसात चौघांचा बळी गेला असल्याने राजगुरूनगर परिसरात रविवार काळावार ठरला आहे.
काव्या अमित बागल (वय दीड वर्षे) असे गळा दाबून खून केलेल्या मुलीचे नाव आहे. तर योगिता अमित बागल (वय 32, रा. मुळगाव पेठ ता. आंबेगाव) असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. पूजा पप्पू चव्हाण (वय 20 रा ताशेरी रामपूर, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या परप्रांतीय महिलेचे नाव आहे. चेतन लहू रोडे (वय 30, रा. तुकई भांबुरवाडी, सध्या गोसासी, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
पहिल्या घटनेत राजगुरूनगर एसटी बस स्थानकाच्या समोरील आनंद नगरमधील श्री हरेश्वर अपार्टमेंटमधील योगिता बागल यांचे पती अमित बागल यांच्यासोबत भांडण झाले होते. दरम्यान, आठ दिवसांपूर्वीही योगित यांनी सॅनिटायझर पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केले होता. दरम्यान, रविवारी (दि. 4) सकाळी योगिता दरवाजा उघडत नव्हती व आतून आवाज येत नसल्याने अमितने पोलिसांना याबाबत खबर दिली. त्यानंतर घराचा दरवाजा तोडण्यात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत तिन्हेवाडी रस्त्यावरील वाळुंजस्थळमध्ये 20 वर्षीय परप्रांतीय पूजा यांचा खून झाला आहे. परप्रांतीय मजूर पूजा व पप्पू चव्हाण हे दाम्पत्य दोन महिन्यांपूर्वी राजगुरूनगर येथे आले होते. शनिवारी (दि. 3) पप्पू चव्हाण हा कामाला गेला होता. संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर त्याची पत्नी पूजा हि बेशुद्ध असल्याच्या अवस्थेत असल्याने तिला तात्काळ दवाखान्यात दाखल केली; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पप्पू चव्हाण यास ताब्यात घेतले आहे. तिचा खून नक्की कोणी व कोणत्या कारणास्तव केला याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
तिसऱ्या घटनेत गोसासी येथे पती-पत्नीच्या किरकोळ भांडणातून पती चेतन यांनी आत्महत्या केल्याची घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. चेतन लहू रोडे हे त्यांच्या गोसासी येथे मामाकडे शेती करीत होते. नवरा बायकोचे किरकोळ भांडण झाल्यानंतर त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती खेड पोलिसांनी दिली. पुढील तापास खेड पोलीस करीत आहेत.