पारगावात शेळके बंधूंची प्रयोगशीलता : ऊस पाहण्यासाठी गर्दी
त्रिभूज शेळके
पारगाव – दौंड तालुक्यातील पारगाव येथील अजित शेळके व राहुल शेळके या प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी बंधूनी आपल्या शेतात एक एकर सहा गुंठे क्षेत्रांत 125 टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले. उसाच्या को- 86032 या वाणाला सुमारे 60 ते 70 कांड्या तयार झाल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस पाहण्यासाठी गर्दी केली होती.
योग्य पाणी, औषध फवारणी, मशागत, कोंबडी खत व योग्य व्यवस्थापन यामुळे हे उत्पादन मिळाले आहे. उसामुळे पावणे चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास शेळके कुटुंबीयांना आहे.
अजित शेळके हे प्रगतशील शेतकरी त्यांचे बंधू राहुल शेळके हे कृषी पदवीधर आहेत. त्यांचा सल्ला मोलाचा ठरला असल्याचे अजित शेळके यांनी सांगितले. लागवड केलेल्या उसाला 45 व्या दिवसांपासून औषध फवारणी करण्यात आली. 60 व्या दिवशी बैलांच्या साह्याने चाळणी करण्यात आली. 90 दिवशी मोठी बांधणी करण्यात आली. संपूर्ण पिकाला कोंबडी खत टाकण्यात आले. त्यानंतर दोनवेळा पाण्यातून वेगवेगळी खते सोडण्यात आली.
दहाव्या महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्यातून एकदा असे सलग चार महिने पाण्यातून खते व औषधे देण्यात आली. उसाची पूर्ण वाढ झाली असून पीक जोमदार यावे म्हणून कृषी मित्र कैलास ताकवले यांचे ही मार्गदर्शन लाभले.
हा ऊस प्रिया शुगर (भीमा पाटस) कारखान्यात पाठवला आहे. लांब काड्यांचा ऊस पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. कारखान्यांच्या चालू बाजारभावाप्रमाणे पावणे चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असे राहुल शेळके यांनी सांगितले. यावेळी प्रिया शुगर साखर कारखान्याचे शेती अधिकारी विकास जेधे, योगेश ताकवणे, दादा तांबे, अमोल यादव, बाजीराव तांबे, विकास ताकवले आदी मान्यवर उपस्थित होते.
पूर्वीपासून आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करीत होतो. आता बंधू राहुल शेळके हे कृषी पदवीधर असल्याने त्यांच्या सल्ल्याने आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
– अजित शेळके, ऊस उत्पादक शेतकरी, पारगाव.
नियोजनबद्ध शेती नक्कीच फायद्याची ठरते. तरुणांनी पारंपरिक शेती करीत असताना त्यामध्ये आधुनिक प्रयोग करून अधिकाधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– राहुल शेळके, कृषी पदवीधर, शेतकरी, पारगाव.