तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
दौंड : शहरातील ऐतिहासिक शाही आलमगीर मशिदीच्या इनामी जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मशिदीच्या विश्वस्ताला तिघांनी मारहाण केल्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी मशिदीचे विश्वस्त ताज गफूर इनामदार, मुलाणी,(रा. विठ्ठल मंदिराच्या मागे, गांधी चौक दौंड) यांनी फिर्याद दिली. पेत्रस स्टीवन केडगावकर, मीना पेत्रस केडगावकर व शमो पेत्रस केडगावकर (सर्व रा. डिफेन्स कॉलनी, दौंड ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सदरची घटना 30 डिसेंबर रोजी डिफेन्स कॉलनी परिसरामध्ये घडली. फिर्यादी डिफेन्स कॉलनी परिसरात आपल्या ताब्यात असलेल्या आलमगीर मशिदीच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी पेत्रस केडगावकर हे फिर्यादी यांच्या जागेतील खोली समोरचे पत्रे तोडून बांधकाम करीत होते.
त्यामुळे फिर्यादी यांनी आपल्या मोबाईल मध्ये त्या बांधकामाचे फोटो काढण्यास सुरुवात केली असता, पेत्रस केडगावकर, मीना केडगावकर यांनी फिर्यादी यांना दगडाने मारहाण केली. तसेच शमो केडगावकर याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण केली. इनामदार यांना मारहाण होत असताना एका मध्यस्थाने भांडणे सोडविली. यावेळी फिर्यादी यांच्या दुचाकीचेही नुकसान करण्यात आले व त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.