पिंपरी – भागीदारीत सुरू केलेल्या मोबाइल दुकान व्यवसायात फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ ऑगस्ट २०२१ ते आजपर्यंत पिंपरीतील शगुन चौक येथील मोबाइल झोन हब येथे घडली.
आयुष रमेश बजाज (वय २५) व रमेळ खुबचंद बजाज (वय ४५, दोघेही रा. बजाज चेंबर, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत सुनील दिलीप डोलवाणी (वय ३२, रा. सफायर पार्क, वाकड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात भागीदारीत मोबाइलचे दुकान सुरू केले होते. त्यासाठी फिर्यादीची जागा वापरण्यात आली होती. मात्र, आरोपींनी भागीदारी करारपत्र करण्यास टाळाटाळ केली. तसेच दुकान व्यवसायाच्या हिशोबात अफरातफर केली. त्याचबरोबर फिर्यादीची मालमत्ता आरोपींनी स्वतःत्या लोभापायी स्वतःकडे ठेवून त्यावर स्वतःचा हक्क सांगत फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक येळे करत आहेत.