वाल्हे : सध्याच्या यांत्रिक युगात बैलांचे प्रमाण जसजसे कमी होऊ लागले आहे तसे त्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली. पुरंदर तालुक्यातील बागायती गाव म्हणून ओळख असलेले मांडकी येथे बेंदूर सणानिमित्त बैलजोडी प्रमाणेच ट्रॅक्टरला फुगे, रंगबेरंगी पट्या, रंगबेरंगी फुलांचे हार तसेच गुलाल आदींनी सजवून बैलजोडीसह, ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात आली.
बेंदूर या दिवशी बैलांना सजवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्याची परंपरा आजही कायम आहे. कृषी संस्कृतीमध्ये बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सणाचे महत्त्वाचे स्थान आहे. सकाळीच बैलांना आंघोळ घालून त्यानंतर दुपारी बेगड, झूल, रंग, शिंगांना बेगड, बाशिंग, फुगे, हिंगुळ आदी साहित्याने बैलांना सजवण्यात आले होते. पण काळाच्या ओघात बैलजोडीचे प्रमाण कमी होत आहे.
दरम्यान, मांडकी येथे भव्यदिव्य मिरवणूक ट्रॅक्टर 45 ते 50 व 15 बैलजोड्या, तसेच जेसीबी यांची डिजे साऊंड सिस्टीमच्या तालावर गुलालाची मुक्त उधळण करीत, फटाक्यांच्या आतषबाजीत ही मिरवणूक लक्षवेधी झाली. सायंकाळी गावातून बैलजोडीसह, ट्रॅक्टर, जेसीबी यांची मांडकी गावांतर्गत सवाद्य मिरवणूक काढली होती.
सध्याच्या यांत्रिक युगात शेतीच्या मशागतीसाठी बैलांच्या झालेल्या कमतरतेमुळे त्याची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने, मांडकी येथे मागील वर्षांपासून ट्रॅक्टर मालकांनी एकत्रित येत बेंदराच्या दिवशी बैलजोडी व ट्रॅक्टर सजवून डिजेच्या तालावर मिरवणूक काढत आहेत. रिमझीम पावसात मिरवणुकीत शेतकऱ्यांसह तरुणांनी हिरिरीने सहभाग घेत जल्लोष साजरा केला.
पाऊस नाही तरी…
शेतकऱ्यांचा सखा असलेल्या सर्जा राजाप्रती आदरभाव व्यक्त करणारा बेंदूर हा सण पिसुर्टी, जेऊर, मांडकी आणि परिसरात मोठ्या उत्साहात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षी, मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस या परिसरात पडला नसल्याने, शेतकरीवर्ग चिंताग्रस्त असतांनाही, बैलांबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न परिसरात शेतकरीवर्गामधून करण्यात आला आहे.