एकाच महिन्यात दुसरी घटना ः 45 हजारांचे नुकसान
भोर – महुडे खोऱ्यातील अतिदुर्गम डोंगरी भागातील महुडे खुर्द (माळेवाडी, ता. भोर) येथे घराला अचानक लागलेल्या आगीत घर व संसारोपयोगी साहित्यासह जनावराचा पेंढा, कडबा जळला असून, सुमारे 45 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या गावातील ही महिन्यातील दुसरी घटना आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, ही घटना रविवारी (दि. 28) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली आहे.
याबाबत ग्रामसेवक एन. पी. राऊत आणि तलाठी दिनेश कपले यांनी दिलेल्या माहितीनुसार महुडे खुर्द (माळेवाडी) येथील शेतकरी दशरथ ज्ञानोबा शिंदे आणि तानाजी ज्ञानोबा शिंदे हे त्यांच्या कुटुंबासह कामास शेतात गेले होते. घरात कोणीही नसताना साडेबाराच्या सुमारास घरातून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. घराला आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आग आटोक्यात येत नाही लक्षात येताच भोर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला याबाबत कळवले. त्वरीत आग्निशमन गाडी यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाली. ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन तासांनी आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य असाणि जनावरांचा चारा, धान्य जळून खाक झाले होते.
या पूर्वी याच गावातील बदक कुटुंबाचे घर जळून सुमारे सहा लाखांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडली असल्याचे सरपंच आकाश कुमकर यांनी सांगीतले. महुडे खुर्द येथील ग्रामसेवक एन. पी. राऊत व तलाठी दिनेश कपले, कोतवाल सुनील जेधे यांनी 45 हजार रुपये नुकसान झाल्याचा पंचनामा केला, असून, तहसीलदारांना अहवाल सादर केला आहे.