अवसरी – गावडेवाडी (ता. आंबेगाव) परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी पाचखिळेमळा वस्तीवर रात्रीच्या सुमारास एका वाहन चालकाला बिबट्या दिसला होत, त्यामुळे सरपंच विजय गावडे आणि ग्रामस्थांनी या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मंचर वन परिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात पिंजरा लावल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
गावडेवाडी परिसरात पाचखिळे मळा वस्तीवर रात्रीच्या सुमारास वाहन चालक अशोक वायाळ यांना बिबट्या दिसल्याचा व्हिडीओ पंचक्रोशीत फिरला होता, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सर्व ग्रामस्थांनी तसेच गावडेवाडीचे विद्यमान सरपंच विजय गावडे यांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाच्या कार्यालयाकडे केली होती.
मंचर वन परिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे वनपाल प्रदीप कासारे तसेच वनरक्षक शिवशरण व वनमजूर अरुण खंडागळे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळी भेट देऊन पिंजरा लावला आहे. यामुळे ग्रामस्थांमधील भीतीचे वातावरण थोडेफार कमी झालेले आहे.
यावेळी सरपंच विजय गावडे यांनी लोकांना बिबट्यापासून काय काळजी घ्यावी याबाबत सूचना देखील दिल्या. सायंकाळी बिबटप्रवण क्षेत्रामध्ये वन विभागाच्या वतीने नाईट पेट्रोलिंग देखील करण्यात येत आहे.