सौभाग्यवती, मुलीला संधी
महिलांमध्येही इच्छुकांची यादी मोठी
रामदास सांगळे
बेल्हे – जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आल्याने जुन्नर तालुक्यातील यात अनेक दिग्गजांचे गट आरक्षित झाल्याने त्यांना रिंगणाबाहेर राहावे लागणार आहेत. काही जणांचे गट आरक्षित झाले असले तरी सौभाग्यवती किंवा मुलीला संधी मिळणार आहे.
राजुरी-बेल्हे जिल्हा परिषदेच्या गटातून सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने या गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नीलम भांबेरे, शीतल औटी, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास त्यांनाही उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे. तर शिवसेनेच्या गटातून संगीता गाडगे व अपर्णा घोडके, माजी पंचायत समिती सदस्या वर्षा पिंगट तर भाजपाकडून अक्षदा शिंदे, कविता तांबे, वैशाली मटाले यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. राजुरी-बेल्हे जिल्हा परिषद गटामध्ये राजुरी व बेल्हे असे दोन पंचायत समिती गण आहेत. राजुरी गणा मध्ये सर्वसाधारण महिलासाठी जागा आरक्षित असून बेल्हे गणात अनुसूचित जमातीसाठी जागा आरक्षित आहे.
राजुरी गणातून राष्ट्रवादीकडून सुप्रिया औटी, प्रमिला घंगाळे व अणे पठार भागावरील प्रियांका दाते, शिवसेनेकडून राजुरी गणातून जयश्री सावंत, शांता गवळी यांचे नाव चर्चेत आहे.
उमेदवाराची शोधाशोध
बेल्हे गणात अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादी व शिवसेनाकडून उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे. तर भाजपातर्फे रोहिणी पंढरीनाथ बांगर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षाच्या निर्णयाकडे लक्ष
सर्व पक्षांमध्ये बेल्हे-राजुरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांची यादी मोठी असली तरी पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांनाच निवडणुकीला सामोरे जाता येणार असल्याने व पक्ष काय निर्णय घेईल याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे. उमेदवारांची संख्या पाहता जिल्हा परिषद गटांमध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे.
नवीन गट नवीन चेहरे?
जुन्नर तालुक्यात नवीन जिल्हा परिषद गट निर्माण झाल्याने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असून बरेच नवीन चेहरे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना उमेदवारांना उमेदवारी देण्यासाठी कसरत करावी लागणार असल्याचे तरी आताचे चित्र आहे.
दुसऱ्या गटात चाचपणी
प्रस्थापितांपैकी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले होते. मात्र, आरक्षण वेगळेच निघाल्याने कुठलाही पर्याय त्यांच्या पुढे उरला नाही. परिणामी अनेक उमेदवार दुसऱ्या गटात व गणात उभे राहण्यासाठी गटाची व गणांची चाचपणी करू लागले आहे.
स्वबळाची तयारी
मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी स्वबळाची तयारी केली आहे; पण खरी लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना (ठाकरे, शिंदे गट), भाजप अशीच रंगण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कॉंग्रेसला अस्तित्व टिकविण्यासाठी झुंजावे लागणार आहे.