राजगुरूनगर – रक्षाबंधन म्हटले की आपल्याला आठवते ती रंगीबेरंगी मनमोहक अशा प्रकारची राखी, जी राखी भावा बहिणींच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. आजच्या आधुनिक युगात फॅन्सी राख्यांची रेलचेल आहे. असे असताना राजगुरूनगर शहरातील एक तरुणाने रक्षाबंधनाचा हा सण साजरा करण्यासाठी “शिवराई’ या शिवकालीन चलनाची संकल्पना त्यांनी वेगळ्या स्वरूपात आणली आहे.
मंदार सदानंदराव खाडे या युवकाने बहिणींना ही शिवकालीन कालीन राखी आपल्या भावाच्या हातावर बांधण्यासाठी आवाहन केले आहे.
शिवराई हे चलन शिव काळामध्ये रोजच्या व्यवहारासाठी चलनात वापरले जायचे. आज हे चलन अतिशय दुर्मिळ झाले आहे. नवीन पिढीला याबद्दल माहिती व्हावी या भावनेतून “शिवराई’ ही राखी त्याने तयार केली आहे.
शिवराय हे चलन अगदी अलीकडच्या काळात पेशवाईपर्यंत सुरू होते. शिवराई म्हणजे आपल्या स्वराज्यातील “स्वराज्यलक्ष्मी’ आहे. ही लक्ष्मी प्रतीकात्मक रुपात प्रत्येक घरात असावी या भावनेतून हिची निर्मिती करण्यात आली आहे. उत्तम दर्जाची ही राखी अतिशय माफक दरामध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे.
याबाबत मंदार खाडे याने सांगितले, आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अमर आहे. आधुनिक युगात त्यांचा इतिहास आणि कार्यप्रणाली आपण जोपासण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. नव्या पिढीला शिवकालीन इतिहासातील चलनाची माहिती व्हावी या भावनेतून शिवकालीन शिवराई या चलनाची प्रतिकृती राख्यांच्या रूपाने साकारली आहे. येत्या रक्षाबंधनच्या सणाला प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला शिवराई राखी बांधावी. उत्तम दर्जाची ही राखी अतिशय माफक दरामध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे.