निमोणे – निमोणे-आंबळे रस्त्यावर असणाऱ्या चासकमानच्या चारी क्रमांक 21 नजीक एका पत्र्याच्या शेडच्या कडेला शनिवारी (दि. 9) दुपारी चारच्या सुमारास जोरदार झालेल्या पावसात वीज कोसळल्यामुळे येथील शेतकरी शहाजी किसन काळे यांच्या नऊ गाभण शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये त्यांचे 1 लाख 25 हजारांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास शिंदोडी, निमोणे, गुनाटसह परिसरात विजेच्या कडकडाटासह मोठया प्रमाणात मुसळधार पाऊस पडला. त्यावेळेस येथील शेतकरी शहाजी काळे शेतात शेळ्या चारत होते. पाऊस आल्याने शेजारीच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी आसरा घेतला. त्यावेळी शेडच्या शेजारी असलेल्या झाडाखाली सर्व शेळ्या उभ्या होत्या. त्यावेळी अचानक वीज कोसळल्याने त्यातील नऊ शेळ्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने शहाजी काळे यांना कोणतीही इजा झाली नाही.
रविवारी (दि. 10) पशूवैद्यकीय अधिकारी नवनाथ पडवळ यांनी घटनास्थळी जाऊन शेळ्यांचे शवविच्छेदन केले. निमोणे गावचे तलाठी विजय बेंडभर यांनी पंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय काळे, डॉ. संतोष जाधव, भाऊसाहेब काळे, भिवसेन काळे, नवनाथ काळे उपस्थित होते.