पुणे – समाविष्ट 11 गावांच्या विकास आराखड्याच्या समितीला एक मार्च 2024 पर्यंत महापालिका प्रशासनाने मुदतवाढ मागितली असून, तसा प्रस्तावही शहर सुधारणा समितीपुढे ठेवला आहे. महापालिका हद्दीत 2017 साली 11 गावे समाविष्ट करण्यात आली. त्याचा इरादा प्रशासनाने 2018ला जाहीर केला होता. विकास आराखडा तयार करून हरकती, सूचना मागवण्यासाठी महापालिकेला दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती.
मात्र, तीन निवडणुकांच्या आचारसंहिता आणि करोना प्रादूर्भावामुळे महापालिका विहित मुदतीत आराखडा बनवू शकली नाही. त्यामुळे महापालिकेने 25 जून 2022 पर्यंतचा वेळ मागितला होता, त्याही कालावधीत आराखडा प्रसिद्ध झाला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता एक मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ मागितली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभोवती वर्तुळाकार रस्ता प्रस्तावित केला आहे. या नियोजित बाह्य वर्तुळाकार रस्त्याची अंतिम 65 मी. रुंदी आणि आखणी पुणे महापालिकेला 11 मे 2023 रोजी झाली.
वर्तुळाकार रस्त्याची आखणी 11 गावांपैकी धायरी, आंबेगाव खु., उरुळी देवाची, फुरसुंगी, लोहगाव या गावांमधून जाते. त्यामुळे या वर्तुळाकार रस्त्याची आखणी 11 गावांच्या प्रारूप विकास आराखड्यात घेणे क्रमप्राप्त होते. विहित कालावधीत म्हणजेच एक मार्च 2024 अखेर प्रसिद्ध करता येऊ शकेल, असे प्रस्तावात म्हटले आहे. त्यानुसार या प्रस्तावाला शहर सुधारणा आणि मुख्य सभेची मान्यता घेऊन सरकारकडे पाठवला जाईल. सरकारने मान्यता दिल्यानंतर यावर हरकती, सूचना घेऊन आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे.
“लॉकडाऊन’मुळे…
महापालिकेत 2017 मध्ये समावेश झालेल्या गावांमध्ये लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (साडेसतरानळी), शिवणे (उत्तमनगर), शिवणे, आंबेगाव खु., उंड्री, धायरी, आंबेगाव बु., फुरसुंगी, उरुळी देवाची यांचा समावेश आहे. या 11 गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याबाबतचा इरादा चार ऑक्टोबर 2018 रोजी प्रसिद्ध केला होता. करोना प्रादूर्भावाच्या काळात घोषित केलेले “लॉकडाऊन’ 24 मार्च 2020 पासून देशभरात लागू झाली. त्यानुसार 24 मार्च 2020 पासून 31 मार्च 2022 पर्यंतचा 738 दिवसांचा कालावधी “लॉकडाऊन’ म्हणूनच ग्राह्य धरण्यात आला आहे. तो या कालावधीतून वगळण्यात येणार आहे.