पिंपरी – गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामध्ये 15 वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 25) मध्यरात्री चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर परिसरात घडली.
शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आनंदनगर झोपडपट्टीमधील कुपर कोपरा येथील गल्लीत नरेश भंडारी, आदित्य व त्यांचा साथीदार असे तिघेजण दारू पित बसले होते. त्यावेळी त्या ठिकाणावरून सुभाष शिंदे हे जात असताना त्यांच्या गाडीला धक्का लागला. या कारणावरून नरेश भंडारी व त्याचे साथीदारांचे सुभाष शिंदे याच्याशी भांडण झाले.
नरेश भंडारी याचे हातात रॉड व आदित्य याचे हातात कोयता असल्याने भांडणात सुभाष शिंदे यांचे नातेवाईकही आले. त्यांना कोयता व लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यावेळी नरेश भंडारी व त्यासोबत असलेल्यांवर खुनी हल्ला करणे व गंभीर दुखापत करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी नरेश भंडारे हा जखमी असल्याने तो वायसीएम रुग्णालयात उपचार घेत आहे. भंडारे याच्या आईनेही चिंचवड पोलीस ठाण्यात त्यानुसार सुभाष शिंदे यांच्या विरोधात भा.द.वि. कलम 325, 34 अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सुभाष शिंदे याच्या विरोधात 2018 मध्ये दुखापत व गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच त्याच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली आहे. तसेच आदित्य आवळू याच्या विरोधात दुखापत करण्याचा गुन्हा दाखल आहे.