पिंपरी – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी विधानसभेचा नियोजित दौरा केला. विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक गुरुवारी(दि. 24) ऑटोक्लस्टर येथे घेऊन पक्षबांधणी आणि संघटनेवर चर्चा केली. तसेच महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन भोसरी विधानसभेतील समस्या आणि विकासकामे यावर चर्चा केली.
रुपीनगर, तळवडे रेड झोनमध्ये येत असला तरी तेथील नागरिकांना प्राथमिक सुविधा पालिकेकडून मिळाव्यात, अशी सूचना आढळराव पाटील यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली. भोसरी विधानसभेत समाविष्ट गावांतील रस्त्यांची कामे त्वरित मार्गी लावावीत. चिखलीमध्ये नागरीकरण वाढले आहे वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडतात, ट्रॅफिकचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो त्यामुळे तेथील रस्त्यांचा विकास पालिकेने लवकर करावा. समस्त देशाचा स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाच्या कामाची माहिती त्यांनी घेतली व याच ठिकाणी संभाजी महाराज यांचा इतिहास येणाऱ्या प्रत्येक पिढीला आत्मसात करता येईल याचे रेखाटन करता येईल का? यावर लक्ष देण्याची सूचना देखील त्यांनी केली. तसेच मोशी येथील हॉस्पिटल, बहुउद्देशीय स्टेडियम, नाशिक फाटा चांडोली कामाची माहिती पिंपरी चिंचवड मधील मराठी अनुदानित शाळांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट देण्यात यावी, अशा अनेक विषयांवर त्यांनी पालिका आयुक्तांबरोबर चर्चा केली.
पोलीस आयुक्तांना शुभेच्छा
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी कामगार नेते इरफान सय्यद जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाट, भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव, उपशहर प्रमुख रामदास गाढवे, बळीराम जाधव, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुनील पवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड, महिला विधानसभा प्रमुख मनीषा परांडे, विधानसभा संघटिका जानवी पवार, वाहतूक आघाडी प्रमुख मानसिंगराव जाधव, सुरेश सूर्यवंशी, संदीप जाधव, राहुल पिंगळे उपस्थित होते.