पुणे -छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने केल्याच्या आरोपावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कोश्यारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आले होते. त्यावेळी राजभवनासमोर घोषणाबाजी करत हे आंदोलन केले. पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस देत आंदोलकांना मज्जाव केला. मात्र काही कार्यकर्त्यांनी रिक्षामधून जाऊन राजभवनासमोर राज्यपालांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारामुळे राजभवन परिसर आणि कार्यक्रमाचे स्थळ असलेल्या “यशदा’ परिसराला बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप आले होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना त्यांच्या प्रतिनिधींसह राजभवनात राज्यपालांना भेटण्याची परवानगी दिली. त्यानंतर काही प्रतिनिधींसह जगताप यांनी कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके भेट दिली.
स्वराज्य संघटनेचे आंदोलन
स्वराज्य संघटनेचे प्रवक्तते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.