मंचर -सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथे बटाटा हे पीक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तेथे बटाटा पीक साठवणूकसाठी कोल्ड स्टोरेज उभारणे, त्याला केंद्राचे अनुदान मिळणे, बटाटा पीक निघाल्यानंतर त्यावर प्रोसेस करून चिप्स बनवणे असे उद्योग उभे करण्यासंदर्भात खासदार आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कार्यवाही करण्याबाबत सूचना करण्यात आल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संजय थोरात यांनी दिली .
पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात खासदार आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे व भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संजय थोरात यांच्या उपस्थितीत कृषी अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक पार पडली. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि विशेषतः पीक विमा संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्यायोजना या तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.
पीक विमा, स्मार्ट, आत्मा, अनुदान अशा विविध विषयावरती सविस्तर चर्चा बैठकीत झाली. खासदार बोंडे यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन केले. बैठकीसाठी सहसंचालक विनयकुमार आवटे आणि कृषी विभागाचे अधिकारी, भाजप किसान मोर्चाचे रोहित चिवटे, जिल्हा सरचिटणीस नवनाथ थोरात, विनायक धुमाळ, सुरेश अभंग, कैलास गांजाळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
जुन्नर, आंबेगावमधील दूध व्यवसायासाठी एनडीडीबीकडून येणारे अनुदान शेतकऱ्यांना गाई खरेदी करण्यासाठी मिळवून देण्याबाबत, दूध व्यवसायामध्ये अनुदान मिळवून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी या बैठकीमध्ये सांगितल्याअसून, सोडवण्यासाठी लक्ष देण्याचेही सांगण्यात आले आहे.
– संजय थोरात, जिल्हा अध्यक्ष, भाजप किसान मोर्चा