हडपसर – हडपसरमधील संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज उड्डाणपुलामुळे पाडून सलग पूल बांधण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 (जुना क्रमांक 9) हडपसर येथील उड्डाणपुलापासून सुरू होतो. हडपसर येथील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता.
परंतु, उड्डाणपुलावर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुकीतून पूल हलू लागला होता. या पुलावरील गर्डरचे बेअरिंग खराब झाल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरविण्यात आल्यानंतर बांधकाम विभाग तसेच महापालिकेने या पुलावरील वाहतूक बंद ठेवली होती. या पुलासाठी वापरण्यात आलेल्या बेअरिंग जुन्या पद्धतीच्या असल्याने त्या बाजारात उपलब्धही नव्हत्या त्यामुळे विशिष्ट साइजच्या या बेअरिंग तयार करून घ्याव्या लागल्या त्यानंतर त्या बदलण्यात आल्या याकामासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागला.
याशिवाय या पुलाची उंची अतिशय कमी असल्याने पुलाशेजारून जाणारी अवजड वाहने पुलाच्या पिलरला धडक आहेत, हा धोका टाळण्यासाठी पुलाच्या पिलरपासून विशिष्ठ अंतरावर सिमेंटचे बॅरिकेटस् उभारण्यात आले आहेत मात्र यातून रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांचा याचा अडथळा होत आहे, यासह अन्य त्रुटी पुलाच्या कामात आहेत.
“हडपसरमधील जनतेच्या हितासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊन हा चुकीचा उड्डाणपूल पाडण्यात यावा आणि नव्याने अखंडपूल बांधण्यात यावा, अशी मागणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.” – प्रमोदनाना भानगिरे, शहरप्रमुख, शिवसेना पुणे शहर