पुणे – भरदिवसा सदनिकांचे कुलुप तोडून दागिने लांबविण्याच्या घटना वाढीस लागल्या असून औंधमध्ये सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड, दागिने असा दोन लाख ११ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याच परिसरातील दोन सोसायटयांमधील सदनिकांचे कुलुप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत विशाल नहार (वय ४०, रा. सिद्धार्थ अपार्टमेंट, गायकवाडनगर, औंध) यांनी चतु: शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नहार कुटुंबीय शुक्रवारी (३० जुलै) सकाळी सदनिका बंद करून बाहेर गेले होते. दुपारी एकच्या सुमारास ते घरी परतले. तेव्हा सदनिकेच्या दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटातील १८ हजारांची रोकड आणि दागिने असा दोन लाख ११ हजारांचा ऐवज लांबविला.
याच परिसरातील महावीर पार्क सोसायटी आणि चिंतामणीनगर को-ऑप सोसायटीतील दोन सदनिकांचे कुलुप तोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रुपेश टेमगिरे तपास करत आहेत. शहरात निर्बंध लागू असताना घरफोडीच्या घटना वाढीस लागल्या आहेत.