पुणे – पुण्यातील कात्रज येथे एका महिलेले चक्क अल्पवयीन मुलाच्या मदतीने आपल्या पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर दोघांनीही मिळून मृतदेह चक्क लोखंडी पाईपाला लटकवला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने मुलाच्या मदतीने काटा काढल्याची बाब उघडकीस आली आहे.
याप्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. तर मुलगा 17 वर्षाचा अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.
प्रकाश किसन जाधव (42) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, शालन जाधव (37)असे आरोपी पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रकाश जाधव यांचा मृतदेह एका खांबाला गळफास घेतलेला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुरवातीला संबंधित व्यक्तीने आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला होता. पोलीसांनी हा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवीला होता.त्यानंतर शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात जाधव यांचा गळा दाबून तसेच डोक्यावर मारहाण करुन खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपीला शोधण्याकरिता तपासाची सुत्रे वेगाने फिरवली. या दरम्यान हा खून जाधव यांच्या पत्नीने त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. पत्नीला अटक करण्यात आली असून मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.
पोलीस निरीक्षक संगीता यादव या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, अंमलदार गणेश भोसले, रविंद्र चिप्पा, सोमनाथ सुतार, सचिन पवार हर्षल शिंदे, संतोष खताळ, गणेश शेंडे, विक्रम सावंत, आकाश भासगे, अभिजित जाधव,राहुूल शेंडगे, रविंद्र भोरडे, गणेश सुतार, तुळशीराम टेंभुर्णे यांच्या पथकाने केला.
दरम्यान, तपास पथकातील पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे आणि शिवदत्त गायकवाड यांना घटनेच्या दिवशी मयाताच्या घरी भांडणे झाल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार तपास अधिकारी वैभव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मयताची पत्नी शालनकडे चौकशी केली. तेव्हा तीने पती नेहमी चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करत होता. घटनेच्या दिवशीही त्याने मारहाण केली. यावेळी मुलाने त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर ढकलून दिले. यामुळे तो बेशुध्द होऊन मयत झाला.