पुणे – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गोडाऊनवर नियुक्तीस असलेल्या कर्मचाऱ्यांना टोळक्याने शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास खराडी येथील महापालिकेच्या गोडाऊनवर घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकास अटक केली आहे.
कैलास धोंडीबा भगत (वय 32, रा. यशवंतनगर, खराडी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यासह चौघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेश लष्करे (वय 54, रा. सासवड रस्ता, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या हातगाडी, वाहने व अन्य वस्तु ठेवण्यात येतात. फिर्यादी व त्यांचे सहकारी स्वप्नीं कोंढरे हे शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास गोडाऊनच्या प्रवेशद्वारासमधाये काम करीत होते. त्यावेळी भगत व त्याचे तीन ते चार साथीदार तेथे आले. त्यांनी फिर्यादी व कोंढरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दोघांनाही लोखंडी सळई व दगडाने बेदम मारहाण केली. या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहे.