पुणे – शहरातील विविध भागात राहणाऱ्या पाच अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कात्रज, कर्वेनगर, येरवडा, लोणीकंद, हडपसर परिसरातील अल्पवयीन मुलींचे अहपरण करण्यात आले आहे.
सर्व अपहरणाच्या घटना १६ ते १८ जून कालावधीत घडल्या आहेत. त्यानुसार संबंधित मुलींच्या पालकांनी हद्दीतील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
कात्रजमधील १० वर्षीय अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेण्यात आले आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यत तक्रार दाखल केली आहे. दुसऱ्या घटनेत कर्वेनगर परिसरातून १३ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. पीडितेच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याशिवाय येरवड्यातील गांधीनगर परिसरातून अज्ञाताने १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. हडपसर परिसरातून १७ वर्षीय मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. दरम्यान, अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती संबंधित पोलिसांनी दिली आहे.