पुणे – चार महिन्यापुर्वी प्रेम विवाह केलेल्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयातून हाताने व ओढणीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी पतीवर सिंहगड रोड पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अजय अंकुश निकाळजे (वय.22,रा. सिंहगड रोड धायरी फाटा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, तो सध्या फरार आहे.
पत्नी दिशा अजय निकाळजे (वय.19,रा धायरी फाटा) हिचा राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. दिशा हिच्या गळ्यावर असलेले व्रण पाहता घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानुसार त्यांनी तपासाला सुरूवात केली होती. सुरुवातीला याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. ही घटना 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावने सातच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा आणि अजय दोघेही जनता वसाहत परिसरात राहत होते. 4 महिन्यांपूर्वी त्यांचा प्रेम विवाह झाला आहे. त्यानंतर ते धायरी येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आले होते. अजय मिळेल ते काम करत होता. तर त्याचे आईवडील व बहीण देखील कामे करतात. शुक्रवारी सायंकाळी अजयची बहीण घरी आली.
त्यावेळी तिला निशा बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आजयच्या आईने तात्काळ घरी येत दिशाला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, हा प्रकार संशयास्पद असल्याने डॉक्टरांनी सिंहगड रोड पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यादरम्यान डॉक्टरांनी दिशाला मृत घोषित केले होते.
निशा आणि अजय या दोघांची कौटुंबिक कारणातून भांडणे होते होती. त्यातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली होती. मात्र आता हा प्रकार चारित्र्याच्या संशयातून घडला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दरम्यान हा प्रकार संशयास्पद वाटत असल्यामुळे पोलीसांनी निकाळजे यांचे घर सील केले होते.