पुणे – अल्पवयीन मुलीला घरात बोलातून तिच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा, तर, त्याला या कृत्यासाठी मदत करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के.के.जहागिरदार यांनी सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
श्रीमंत स्वामी (वय 24) याला पाच वर्षे, तर शंकर स्वामी (वय 20) याला तीन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. यु.बी.ओमासे यांनी या प्रकरणाचा तपास केला. तर नीलेश देवकर यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.
चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत 13 मे 2019 रोजी ही घटना घडली. दुपारी बाराच्या सुमारास 14 वर्षीय पीडित गॅलरीमध्ये उभी होती. त्यावेळी घरासमोर राहणाऱ्या श्रीमंत याने तिला त्याच्या घरात बोलविले. त्यावेळी शंकर घरात होता. ती घरात जाताच शंकर घराच्या दरवाजाला बाहेर कडी लावून निघून गेला.
श्रीमंत याने तिच्याशी लैंगिक चाळे केले. ती ओरडल्यानंतर तिच्या मामाच्या मुलाने जाऊन तिची सुटका केली. त्यानंतर याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सरकारी पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने शिक्षा सुनावली.