पुणे – कोंढवा परिसरामध्ये दहशत पसरवण्यासाठी बेकायदेशीरपणे तलवारी व हत्यार साठा करणार्याच्या कोंढवा पोलिसांकडून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अधिकारी पि.यू .कापुरे व तपास पथकातील अंमलदार कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील व पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यां च्या सूचनेप्रमाणे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे व सुशील धीवार यांना त्याचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, शिवनेरी नगर भागातील रावडी बिल्डिंग मध्ये राहणारा संजय पोले नावाचा इसम याने बेकायदेशीरपणे तलवार व कोयते अशी हत्यारे गोळा करून ठेवले आहेत.
सदर मिळाली बातमी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पि.यू.कापुरे यांना कळविली असता त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांना कळविले असता त्यांनी योग्य ती कारवाई करणेबाबत कळविल्याने तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी रावडी बिल्डिंग मध्ये राहत असलेला संजय रोहिदास पोले ( 34 राहणार रावडी बिल्डिंग गेट नंबर 1 रावडी कंपनीच्या मागे शिवनेरी नगर गल्ली नंबर 31 कोंढवा खुर्द ) या त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली.
त्याच्या घरातील लाकडी पेटीतून दोन लोखंडी तलवार, दोन कोयते एक सुरा अशी हत्यारे मिळाली. सदर हत्यार जवळ बाळगण्याचे कारण विचारले असता परिसरात दहशत पसरविण्यासाठी जवळ बाळगली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25), सह महाराष्ट्र पोलीस अँक्ट कलम 37( 1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कापुरे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी नामदेव चव्हाण (अप्पर पोलीस आयुक्त ) नम्रता पाटील (पोलीस उप आयुक्त ), राजेंद्र गलांडे (सहा. पोलीस आयुक्त), सरदार पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), शब्बीर सय्यद (पोलीस निरीक्षक) यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे उप. निरिशक प्रभाकर कापुरे, पो.हवा. योगेश कुंभार, पो.ना.पृथ्वीराज पांडुळे, सुशील धिवार, पो.अंमलदार मोहन मिसाळ,अभिजीत रत्नपारखी, महेश राठोड यांच्या पथकाने केली आहे.