पुणे – मित्रांनीच अल्पवयीन मित्राचे अपहरण करुन त्याच्या आईकडे दिड लाखाची खंडणी मागणाऱ्या मुख्य आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. गुन्हा घडल्यापासून आरोपी पोलिसांना हुलकावणी देत होता.
अखिल पलांडे (26 रा. मुंजोबा वस्ती, धानोरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अगोदर रोहन गुंजाळ (19, रा. येरवडा), चेतन रणदिवे (20,रा.येरवडा), आशुतोष भुजबळ(19, धानोरी) यांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा आणी आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. यातील गुंजाळ, रणपिसे आणी भुजबळ यांनी त्याला धानोरी येथील भैरवनगरमध्ये सोमवारी बोलावून घेतले होते. यानंतर त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीस फोन करुन त्याला आमच्यासोबत आणले असल्याचे सांगितले. त्याला तेथे दमदाटी करत पलांडे याने तुझ्याकडून दिड लाख रुपये घेण्यास सांगितले असल्याचा निरोप देत पैशाची मागणी केली. त्याने नकार दिला असता आरोपींनी त्याला बांबु, लोखंडी पाईप आणी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
यानंतर त्याचा मोबाईल हिसकावून त्याच्या आईला फोन लावला. त्याच्या आईला तुम्ही मध्ये पडून नका आम्ही आमचे बघुन घेऊ असे म्हणत शिवीगाळ केली. यानंतर पुन्हा फिर्यादीला मारहाण करुन तीघेही पळून गेले होते. तीघांनाही विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली होती. मात्र पलांडे हा फरार होता.
समांतर तपास करताना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला पलांडे हा अलंकार टॉकीज समोरील ब्रिजवर थांबला असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार त्याला सापळा रचुन अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, पोलीस अंमलदार गणेश पाटोळे, गणेश ढगे, ऋषिकेश कोळप यांचे पथकाने केली.