पुणे – फ्लॅट सोडण्यास सांगितल्याच्या रागातून भाडेकरूने निवृत्त लष्कर अधिकाऱ्याच्या घरात मुद्दामहून रॉकेलचा दिवा लावून पेटवून दिल्याचा प्रकार वानवडीत घडला आहे. याबाबत डॉ. युगांध रंगनाथ शिंदे (रा. धनकवडी) यांच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय लष्कर अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे.
तक्रारदार कर्नल पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा वानवडीतील रहेजा गार्डन येथे फ्लॅट आहे. त्यांनी डॉक्टर युगांध यांना राहण्यासाठी भाडेतत्वावर फ्लॅट दिला होता. ऑगस्ट महिन्यात त्यांनी डॉक्टरांना फ्लॅट सोडण्यासाठी सांगितले होते. फ्लॅट खाली करून देण्यासाठी ते डॉ. युगांध यांच्याकडे पाठपुरावा करत होते. त्याच रागातून फ्लॅटमध्ये लाईट नसल्याने डॉ. युगांध जाणीवपुर्वक फ्लॅटमध्ये रॉकेलचा दिवा लावला. त्यामुळे प्लॅटला आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी वानवडी पोलिस तपास करत आहेत.