सध्याच्या तरुणाईला नकोसे झालेय विवाहाचे बंधन! ‘ही’ आहेत कारणे…

पूर्वीच्या काळात, जेव्हा विवाह होत असत, तेव्हा बहुतांश वेळी असे दिसून आले की मुलांचे विवाह घरच्यांनी आपापसात बोलल्यानंतर निश्चित केले जायचे. त्याचबरोबर लग्नाआधी मुले आणि मुली एकमेकांना भेटू शकत नव्हते. अशा परिस्थितीत आवडी -निवडी सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

थोडक्यात, पूर्वी सर्रास ‘अरेंज मॅरेज’ व्हायचे. पण आता काळ बदलला आहे आणि आता कुटुंबातील सदस्यांच्या निवडीबरोबरच मुले -मुली सुद्धा एकमेकांना पसंत आणि नापसंत करतात. त्यांना पटले तरच लग्नाचे प्रकरण पुढे जाऊ शकते. 

त्याचबरोबर आजकाल लोक आधीच रिलेशनशिपमध्ये राहतात आणि नंतर ते लव्ह मॅरेज करतात, असा काहीसा ‘ट्रेंड’ सुरू आहे.  परंतु हे सर्व असूनही सध्याच्या काळाची तरुणाई लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याचेही दिसत आहे. काय आहेत यामागील कारणे? चला, जाणून घेऊया. 

कुटुंबाची जबाबदारी टाळण्याकडे कल 

आजच्या काळातील तरुणांना कोणाचीही जबाबदारी घ्यायची नाही, असे दिसते. अनेकांना असे वाटते की ते त्यांच्या सासू-सासऱ्यांसह इतर कुटुंबांशी जुळवून घेऊ शकणार नाहीत.  म्हणूनच प्रत्येक वेळी ते आपल्या कॅरियर आणि फ्यूचरच्या स्वप्नांना मध्ये आणून भरपूर पैसे कमविण्याचे ध्येय ठेवून लग्नापासून दूर जाताना दिसतात.

पालकांच्या भांडणांमुळे लग्नाबाबत चीड 

क्वचितच असे घर असेल जिथे कुणाच्या पालकांमध्ये भांडण किंवा वाद होत नसेल.  फरक एवढाच आहे प्रत्येक घरात याचे प्रमाण कमी-जास्त असते. अशा परिस्थितीत आपल्या पालकांचे हे भांडण पाहूनही मुले लग्नापासून दूर जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. लग्नानंतर स्वतःबाबत असे होऊ नये असे त्यांना वाटते.

घटस्फोटाची भीती 

तरुणाई लग्नापासून दूर जाण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे घटस्फोटाची भीती. बरेच लोक आपल्या जोडीदाराशी पटत नसल्यामुळे घटस्फोट घेतात. मग एखादी व्यक्ती त्यांच्या मित्रांबाबत किंवा नातलगांची अशीच परिस्थिती पाहते.  या कारणामुळेदेखील आजच्या तरुणाईचे मन बदलत आहे आणि  ते लग्नासंदर्भात अतिशय विचारपूर्वक पावले उचलताना दिसत आहेत. घटस्फोटाची वेळ येऊ नये, म्हणून अनेकजण ‘लग्न नको’ ही भूमिका घेताना दिसतात.

स्वातंत्र्य आणि मोठी स्वप्ने

आजच्या तरुणांना मोकळे राहणे आवडते.  त्यांना असे कोणीही नको आहे जे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेईल. त्यांना प्रतिबंध करणारे, जाब विचारणारे लोक आवडत नाहीत. त्यांना वाटते की लग्नानंतर ते या जबाबदाऱ्यांशी जकडले जातील, ज्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य संपेल.  म्हणूनच ते  लग्नापासून दूर पळताना दिसतात. तर काही लोक जीवनात मोठी स्वप्ने पाहतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना कोणतेही बंधन नको असते. त्यामुळे ते लग्नाचा विचार करताना दिसत नाहीत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.