पुणे – मृत जनावरे उचलण्याचे ठेका संपल्यानंतर ठेव असलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेतील शिपायाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. इर्शाद असे गुन्हा दाखल केलेल्या शिपायाचे नाव आहे. तो महापालिकेच्या आरोग्य भवन येथे कामाला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदारला महापालिका हद्दीतील मृत जनावरे उचलण्याचा ठेका मिळाला होता. या कराराची मुदत संपली. त्यानंतर महापालिकेकडे ठेव असलेली सुमारे साडेपाच लाख रुपयांची रक्कम परत मिळण्यासाठी तक्रारदार प्रयत्न करत होते. त्यापैकी निम्मी रक्कम तक्रारदाराला परत मिळाली होती. उर्वरित रक्कम परत मिळण्यासाठी इर्शाद याने वरिष्ठांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात इर्शाद याने वरिष्ठांसाठी तडजोडीत २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे उघडकीस आले. दरम्यान, तक्रारदार यांना उर्वरित रक्कम परत मिळाली. त्यामुळे तक्रारदार यांनी माघार घेतली होती. मात्र, लाचेची मागणी झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, प्रवीण तावरे, कदम यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करीत आहेत.