उंब्रज -पुणे – बंगळुरु महामार्गावर उंब्रजजवळील भोसलेवाडी गावाच्या हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या कारच्या चालकाचा ताबा सुटून कार डिव्हायडरला धडकून झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर पत्नीसह तिचा पती अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दि. 9 रोजीच्या पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. कोल्हापूरला असणाऱ्या मुलाला आणण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडल्यामुळे हलहळ व्यक्त होत आहे.
अमित आप्पाजी गावडे (वय38), डॉ. अनुजा अमित गावडे (वय 35, दोघे रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, हडपसर, पुणे) या दाम्पत्यांचा या अपघातात मृत्यू झाला. याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की सातारा ते कराड लेनवरून कोल्हापूरकडे जाणारी कार (एमएच 12 जेयू.8892) ही भोसलेवाडी हद्दीतून भरधाव वेगात जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या डिव्हायडरला धडकून सातारा लेनवर पलटी झाली. यामध्ये कारमधील अमित गावडे व डॉ. अनुजा गावडे गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. अपघातातील दाम्पत्य त्यांच्या मुलाला कोल्हापूरला आणण्यासाठी जात असल्याची
माहिती घटनास्थळावरून समजली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून अपघाताची माहिती समजताच उंब्रज पोलीस, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, सलीम देसाई, रमेश खुणे यांनी अपघातस्थळी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. मुलाला आणम्यासाठी जाताना झालेल्या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.