पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शिवाय ऑक्सिजन बेडवरील रुग्णांची संख्या अधिक असल्याने ऑक्सिजनची मागणीही अधिक होती. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने तत्परतेने नियोजन करत ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्टची निर्मिती करायला सुरुवात केली. पुढील काही दिवसात महापालिका शहरात दिवसाला तब्बल 20 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करू शकणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महापालिकेने ऑक्सिजन निर्मितीचे 2 प्रकल्प सुरू केले असून, ही संख्या 12 पर्यंत जाणार आहे. त्यातच करोनाची दुसरी लाट ओसरत असताना गंभीर रुग्णसंख्या अजूनही करोनामुक्त होणाऱ्या संख्येच्या तुलनेत घटलेली नाही. शिवाय तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी म्हणून महापालिकेने ऑक्सिजन निर्मितीवर भर दिला आहे. म्हणूनच पुणे महापालिकेच्या प्लांटची एकूण क्षमता 10,583 लिटर/प्रति मिनिट (ङझच) पर्यंत जाणार आहे.
महापौर म्हणाले, ‘पुणे शहरात करोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे या कालावधीमध्ये ऑक्सिजनची मोठी गरज होती. यामुळे नियोजन करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे मध्यम आणि मोठ्या मनपाचे हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट बसविणे आवश्यक झाले.
महानगरपालिकेमार्फत 8 हॉस्पिटलमध्ये 12 प्लांट बसविण्यात येत आहेत. यापैकी काही प्लांट अमेरिका, फ्रान्स आणि नेदरलॅंडवरून मागविण्यात येत आहेत. तर काही प्लांट झिओलाइट (ूशरश्रळींशी) व इतर काही महत्त्वाचे पार्टस आयात करून भारतामध्ये बनवण्यात येणार आहेत’. सर्व प्लांटमधून एकूण 10583 लिटर प्रति मिनिट (सुमारे 20 टन प्रतिदिन) या दराने दररोज ऑक्सिजन निर्माण होणार असून, तो रुग्णांना पुरविण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेकडे सध्या 40 टन लिक्विड ऑक्सिजनचा साठा करण्यासाठी एकूण 7 टॅंक बसविण्यात आले आहेत.’