‘आयुष्यमान भारत’ला पालिकेचा खो

केवळ 30 टक्‍के लाभार्थ्यांनाच माहितीपत्रके वाटप : आयुक्‍तांनी घेतली गंभीर दखल

पुणे – केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थिंना माहितीपत्रके वाटप करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. मात्र, शहरातील 80 ते 85 हजार लाभार्थिंपर्यंत ते अद्याप पोहोचले नसल्याने त्यांना योजनेची माहिती नाही. त्यामुळे त्यांना योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्‍तांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना तातडीने ही पत्रके लाभार्थिपर्यंत पोहोचविण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्र शासनाकडून 2018 मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजना प्रस्तावित केली आहे. यासाठी शहरातील 1 लाख 31 हजार लाभार्थी पात्र झाले आहेत. त्यांना केंद्राने निश्‍चित करून दिलेल्या शहरातील 9 आणि जिल्ह्यातील 28 हॉस्पिटलमध्ये 921 आजारांवरील उपचारासाठी कुटुंबासाठी प्रती वर्षे 5 लाखांचा उपचार घेता येणार आहे. केंद्राकडून लाभार्थी निश्‍चित केल्यानंतर त्यांचे नाव, पत्ता असलेली 1 लाख माहितीपत्र पालिकेस पाठविली होती. ती पालिकेने संबंधितांना घरपोच द्यायची होती. त्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू आहे. मात्र, गेल्या वर्षभरात केवळ 45 हजार लाभार्थ्यांनाच ही पत्रके वाटप झाली असून उर्वरित पालिकेत पडून आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना आपण पात्र असल्याची माहितीच नाही. आरोग्य विभागाकडून ही लाभार्थी यादी क्षेत्रीय कार्यालयांना दिली होती. मात्र, त्यांच्याकडून चालढकल करत हे काम सुरू आहे.

लाभार्थ्यांना मिळणार ई-कार्ड
लाभार्थिंनी ई-सेवा केंद्रात माहिती पत्राच्या आधारे योजनेसाठीचे ई-कार्ड काढणे आवश्‍यक आहे. या कार्डवर संबंधित कुटुंबाची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात असणार असून त्यावर लाभार्थी क्रमांक असणार आहे. उपचारावेळी या कार्डच्या आधारावर निश्‍चित करून देण्यात येणाऱ्या रुग्णालयात उपचार घेता येणार आहे. मात्र, माहितीच नसल्याने अनेकांनी अद्यापही ई-कार्ड काढली नसल्याचे चित्र आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×